शुक्रवार, 26 अगस्त 2011

बेटी बचाओ जनजागरण…कीर्तनातून

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११
मुलगा हा वंशाचा दिवा आहे. प्रत्‍येक धार्मिक कार्य मुलानेच केले पाहिजे. मुलांनी पित्‍याच्‍या चितेला अग्नी दिला पाहिजे. पुत्रजन्‍माशिवाय मोक्ष नाही. मुलगी ही दुस-याचे धन अशा अनेक खुळया समजुती आजही समाजात दिसून येतात. 'मुलगाच हवा' या मानसिकतेतून मुलींचा जन्‍म नाकारला जातो. फुले-शाहू-आंबेडकरांच्‍या विचारांचा वारसा लाभलेल्‍या पुरोगामी महाराष्‍ट्रात स्‍त्री भ्रूण हत्‍येचे प्रमाण वाढले असल्‍याचे नुकत्‍याच झालेल्‍या जनगणनेवरुन दिसून आले.

समाजात मुलींची संख्‍या घटल्‍यास काय गंभीर परिणाम होऊ शकतात, याची जाणीव झाल्‍याने विविध सामाजिक संस्‍था, सेवाभावी संघटना, स्‍वयंसेवी संस्‍था पुढे आल्‍या. स्‍त्री जन्‍माचे स्‍वागत, लेक वाचवा अभियान, लाडली बेटी, बालिका सप्‍ताह असे वेगवेगळे उपक्रम राबविण्‍यास सुरवात झाली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्‍या परभणी जिल्‍हा शाखेनेही या सामाजिक प्रश्‍नाचे महत्‍त्‍व ओळखून किर्तनाच्‍या माध्‍यमातून जनजागरण करण्‍यास प्रारंभ केला आहे.

महाराष्‍ट्र ही संत-महंतांची भूमी आहे. ज्ञानेश्‍वर माऊलींपासून तुकोबाराय, नामदेव महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराजांपर्यंत अनेकांनी किर्तनाच्‍या माध्‍यमातून समाजातील अनिष्‍ट चाली-रिती, रुढी-परंपरा, अंधश्रध्‍दा या विरुध्‍द जनजागरण केले. त्‍या-त्‍या काळात तत्‍कालिन संतांचे योगदान समाजाभिमुखच राहीले आहे. आज समाजापुढे अंधश्रध्‍दा, भ्रष्‍टाचार, बेकारी, दारिद्रय, कुपोषण, विषमता, जातीभेद, दहशतवाद, स्‍त्री भ्रूण हत्‍या अशा विविध समस्‍या उभ्‍या आहेत. या समस्‍यांबाबत जनजागरण करण्‍यासाठी किर्तन हे पारंपरिक माध्‍यम फार प्रभावी ठरु शकते, हे लक्षात घेऊन वारकरी मंडळाचे अध्‍यक्ष हभप प्रकाशमहाराज बोधले यांच्‍या मार्गदर्शनानुसार राज्‍यव्‍यापी जनजागृती अभियानाचा शुभारंभ परभणी जिल्‍ह्यातील श्रीक्षेत्र त्रिधारा येथून झाला. यावेळी जिल्‍हा पोलीस अधीक्षक मैथिली झा, केशवराव भरोसे, सोपान महाराज बोबडे, बालासाहेब मोहिते-पाटील, ज्ञानोबा माऊली शिंदे यांच्‍यासह असंख्‍य भाविक उपस्‍थित होते.

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे केंद्रीय संघटक महंत अमृत महाराज जोशी यांनी किर्तन करुन या जनजागरण मोहिमेचा प्रारंभ केला. आपल्‍या किर्तनात त्‍यांनी 'स्‍त्री जन्‍माचे महत्‍त्‍व' विशद केले. प्राचीन काळी स्‍त्रियांना समाजात मानाचे आणि आदराचे स्‍थान होते. गार्गी, मैत्रेयी, अरुंधती, लोपामुद्रा, अहल्‍या, सीता, सावित्री, राधा, द्रोपदी अशा अनेक स्‍त्रियांची उदाहरणे देऊन 'मातृ देवो भव:' या वचनाची आठवण करुन दिली. राजमाता जिजाऊ, लोकमाता अहल्‍यादेवी होळकर, राणी लक्ष्‍मीबाई, क्रांतीज्‍योती सावित्रीबाई फुले, मदर तेरेसा, इंदिराजी गांधी अशा अनेक महिलांनी इतिहास घडविलेला आहे. आपल्‍या अलौकीक कार्यामुळे त्‍या आजही वंदनीय, पूजनीय आहेत. आध्‍यात्‍मिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैज्ञानिक अशा विविध क्षेत्रात स्‍त्रिया आघाडीवर असताना स्‍त्री जन्‍माला गौण का समजले जाते, असा प्रश्‍न महंतांनी उपस्‍थित केला.

पोलीस अधीक्षक मैथिली झा यांनी स्‍त्री भ्रूण हत्‍या रोखण्‍यासाठी सामूहिक प्रयत्‍नांची गरज प्रतिपादन केली. स्‍त्री भ्रूण हत्‍या रोखण्‍यासाठी करण्‍यात आलेल्‍या कायद्याची अंमलबजावणी होत आहे. तथापि स्‍त्रियांबाबत असलेला समाजाचा दृष्‍टिकोनही बदलण्‍याची आवश्‍यकता आहे. स्‍त्री भ्रूण हत्‍येचा प्रश्‍न केवळ ग्रामीण भागापुरताच मर्यादित नाही. तथाकथित सुशिक्षीत, सधन शहरी भागातील समाजामध्‍येही मुलींकडे बघण्‍याचा दृष्‍टिकोन नकारात्‍मक आहे. ही परिस्‍थिती बदलण्‍यासाठी व्‍यापक प्रमाणावर जनजागरण व्‍हावयास हवे, असे त्‍या म्‍हणाल्‍या. समाजातील स्त्रियांचे प्रमाण घटल्‍यास निर्माण होणा-या गंभीर प्रश्‍नाची जाणीव त्‍यांनी सर्व उपस्‍थितांना करुन दिली.

भारतीय समाजव्‍यवस्‍था पुरुषप्रधान असली तरी स्‍त्रियांनी संधी मिळाल्‍यानंतर त्‍यांनी स्‍वत:ची क्षमता सिध्‍द केली आहे. समाजामध्‍ये परिवर्तन घडवण्‍याची उपजत शक्‍ती स्‍त्रियांमध्‍ये आहे. मात्र तिला नेहमीच दुय्यम स्‍थान दिले जात असल्‍याने आपल्‍या शक्‍तीची जाणीव राहिली नाही. स्‍त्रियांनी स्‍त्रियांच्‍या आत्‍मसन्‍मानासाठी उभं राहिलं पाहिजे. कुटुंबाच्‍या दबावाखाली न येता मुलगी असो वा मुलगा त्‍या जीवाला जन्‍म देण्‍याचा ठाम निर्धार करण्‍याची शक्‍ती आणि हिंमत स्त्रियांमध्‍ये आली पाहिजे. स्‍वातंत्र्यानंतरच्‍या काळात शिक्षणाचा प्रसार झाला. महिलांनाही शिक्षणाची संधी मिळाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विकासाच्‍या वाटा मोकळया झाल्‍या. तथापि परंपरागत रुढी, परंपरा, सामाजिक, कौटुंबिक बंधने यामुळे स्‍त्रियांचा म्‍हणावा तसा विकास होऊ शकला नाही.

स्‍त्री दुय्यम आहे, असे संस्‍कार लहानपणापासून मनावर बिंबवल्‍या गेल्‍यामुळे त्‍यांच्‍यात नकळतपणे हीनत्‍वाची भावना निर्माण झाली. आपल्‍यातील सुप्‍त शक्‍ती ओळखण्‍यासाठी सर्वच महिलांनी एकत्र आले पाहिजे. स्‍त्री आणि पुरुष ही निसर्गाची दोन विभिन्‍न अंगे आहेत. त्‍यांच्‍या शिवाय नवजीवनाची कल्‍पना करणे अशक्‍य आहे. मानववंश पुढे वाढविणा-या स्‍त्रीला या जगामध्‍ये येण्‍यापासून रोखणे, हा निसर्गावर केला जाणारा एक प्रकारचा अन्‍याय म्‍हणावा लागेल, याची जाणीवही सर्वांमध्‍ये निर्माण व्‍हावयास हवी.

आरोग्‍य-विज्ञानाची प्रगती झाली. मानवी जीवनाचे आयुष्‍य वाढले. अत्‍याधुनिक यंत्रसामग्री व अद्ययावत औषधोपचार यामुळे जीवन रोगमुक्‍त होण्‍यास मदत झाली. गर्भात काही दोष असतील तर ते समजावे, यासाठी सोनोग्राफी सारख्‍या यंत्राचा वापर करता येऊ शकतो. तथापि या गर्भजल चिकित्‍सेचा गैरवापर करुन स्‍त्री गर्भाची हत्‍या केली जाते. स्‍त्री-पुरुष समानतेच्‍या गोष्‍टी मोठया प्रमाणावर केल्‍या जात असल्‍या तरी व्‍यवहारात स्‍त्रियांना समानतेची वागणूक मिळत नाही, हे कटु सत्‍य आहे. सोनोग्राफीकेंद्राचा गैरवापर करणा-या विरुध्‍द कडक कारवाई त्‍याच बरोबर 'मुलगा असो वा मुलगी दोन्‍ही समान' याबाबत जनजागृती केली गेली पाहिजे.

स्‍त्री भ्रूण हत्‍येचा प्रश्‍न केवळ आर्थिक नसून सामाजिक आहे. मुलगा हा वंशाचा दिवा आहे, ही समजूत कशी चुकीची आहे, हे सोदाहरण सिध्‍द केले पाहिजे. सामाजिक प्रबोधन आणि लोकशिक्षण करण्‍यासाठी किर्तन-प्रवचनाचे माध्‍यम निश्‍चितच प्रभावी ठरु शकते. किर्तन-प्रवचनाच्‍या माध्‍यमातून होणा-या सामाजिक प्रबोधनामुळे लोकांच्‍या 'मुलगाच हवा' या विषयीच्‍या भ्रामक कल्‍पना, अंधश्रध्‍दा दूर होतील आणि तर्कशुध्‍द विचार करुन स्‍त्री भ्रूण हत्‍येसारख्‍या सामाजिक समस्‍या कमी होतील, अशी आशा वाटते.

  • राजेंद्र सरग 

  • कोई टिप्पणी नहीं:

    एक टिप्पणी भेजें