शुक्रवार, 26 अगस्त 2011

स्त्री- पुरुष असमतोल ही गंभीर सामाजिक समस्येची नांदी - गृहमंत्री आर. आर. पाटील

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०११
स्त्रीभ्रृणहत्येच्या कारणामुळे वाढत असलेला स्त्री-पुरुष असमतोल ही पुढील काळातील गंभीर अशा सामाजिक समस्येची नांदी असून त्याला वेळीच आवर घालण्यासाठी सर्वांनी एकत्रित व एकदिलाने काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सातारा जिल्ह्यातील नायगाव (ता. खंडाळा) या जन्मगावी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांनी आयोजित 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा... ' या कार्यक्रमांतर्गत नायगाव ते महात्मा फुले वाडा, पुणे या पदयात्रेचा शुभारंभ गुरुवारी झाला. त्यावेळी गृहमंत्री श्री. पाटील बोलत होते. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री रामराजे नाईक-निंबाळकर, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, कार्यक्रमाच्या निमंत्रक खासदार सुप्रिया सुळे, सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ज्योती जाधव, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता दगडे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, लक्ष्मणराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, ऍ़ड. अशोक पवार, विलास लांडे, अनिल भोसले, उदय सावंत, प्रभाकर घार्गे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, मुंबई-पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यात आर्थिक समृद्धीमुळे सधनता आली आहे. तसेच दरडोई उत्पन्न वाढले आहे. मात्र या समृद्धीची दुसरी काळी बाजू स्त्री भ्रृणहत्येच्या भयानक रुपामध्ये समोर आली आहेत. काही जिल्ह्यात तर दरहजारी पुरुषांमागे स्त्रीयांचे प्रमाण ८२५ इतके खाली घसरले आहे. ज्या ठिकाणी सधनता नाही अशा गडचिरोलीसारख्या अर्थिकदृष्ट्या अविकसित जिल्ह्यात मात्र पुरुषांच्या जवळपास बरोबरीची लोकसंख्या स्त्रीयांची आहे.

वाढत्या स्त्री- पुरुष असमतोलामुळे पुढील काही वर्षात दरहजारी १०० ते १५० मुले बिनलग्नाची राहण्याची भिती आहे. आणि यामुळे ही मुले पुढे सामाजिक स्वास्थ्य टिकू देतील की नाही ही भिती आहे. या नाईलाजाने ब्रम्हचारी झालेल्यांना आवरणे कठीण जाईल, असेही गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले.

श्री. पाटील म्हणाले की, पूर्वी महिलांवर जन्माला आल्यानंतर अन्याय, अत्याचार व्हायचा, मात्र आता तर मुलीचा जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात आहे. ज्या कायद्यांना जनमताचा पाठिंबा नाही, ते कायदे केवळ कागदावर करुन यशस्वी होत नाहीत. हुंडाबंदीसारखा कायदा करुनही अजुनही हुंडाबळी जातो, हुंड्यासाठी छळ केला जातो, हे याचे उदाहरण आहे. म्हणून स्त्री भ्रृणहत्या रोखायची असेल तर कायद्याबरोबरच लोकजागृती, लोकशिस्त हेच या कामासाठी अधिक प्रभावी ठरेल.

श्री. भुजबळ म्हणाले की, सुशिक्षित असतात ती सर्व माणसे सुसंस्कृत असतातच असे नाही, तसेच अशिक्षितही सुसंस्कृत असू शकतात. लेक वाचवा, लेक जगवा या चळवळीला सुसंस्कृत लोकांमुळेच अधिष्ठान मिळणार आहे. महिलांना घरात कोंडून ठेवले, त्यांना शिक्षण दिलं नाही अशी राष्ट्रे अविकसित राहिली. म्हणून देशाचा विकास साधायचा असेल तर महिलांना पुढे येण्याची संधी, शिक्षणाची संधी देणे गरजेचे आहे.

ग्रामविकासमंत्री जयंत पाटील म्हणाले की, स्त्री भ्रृणहत्येची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आता 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा... ' या कार्यक्रमांतर्गत पदयात्रेच्या माध्यमातून सावित्रीबाईंच्या गावामधून पुन्हा एकदा हा सामाजिक समतेचा संदेश राज्यभरात पोहोचेल. केंद्र शासनाचा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षणाचा निर्णय राज्य शासनाने लागू केल्यामुळे पुढील काळात ५९ ते ६० टक्के महिला राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करताना दिसतील.

खासदार श्रीमती सुळे यांनी या कार्यक्रमामागची भूमिका स्पष्ट करुन सांगताना माहिती दिली की, पुण्यासारख्या पुरोगामी विचाराच्या जिल्ह्यामध्ये २०११ च्या जनगणनेनुसार दर हजारी मुलांमागे ८७५ मुलीं आहेत. २००१ मध्ये हेच प्रमाण ९२० इतके होते. गेल्या दहा वर्षात या प्रमाणात जवळपास ५० ची घट झाली आहे. याची कारणे पाहता हा सामाजिक, कौटुंबिक प्रश्न असल्याचे लक्षात येते. केवळ कायदे करुन चालणार नाही तर त्यासाठी प्रत्यक्ष प्रबोधनाची, जनजागृतीची गरज आहे. म्हणून या प्रश्नावर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून येत्या ५-१० वर्षात सतत काम करण्यात येणार आहे. हा प्रश्न लिंग समानतेचा (जेंडर इक्विलिटी) आहे. लिंगनिदान तंत्राचा गैरवापर होऊ नये म्हणून पोलीस खात्याने सोनोग्राफी सेंटर्सवर कारवाई करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका घ्यावी. येत्या वर्षभरात राज्यातील २ हजार कॉलेजेस मध्ये स्त्रीभ्रृण हत्या या प्रश्नावर जागृती करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे.

यावेळी ऍ़ड. वर्षा देशपांडे यांनी प्रभावी भाषण करुन स्त्री भ्रृणहत्या प्रश्नी सरकारने निर्णायक भूमिका बजावण्याचे आवाहन केले.

प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकापासून पदयात्रा सर्व मान्यवरांसह मेळाव्याच्या (कार्यक्रमाच्या) ठिकाणी आली. केवळ एका मुलीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करुन घेणाऱ्या दहा महिलांचा सत्कार या कार्यक्रमात मधुकरराव पिचड यांच्या हस्ते करण्यात आला. मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून स्वत:च्या निधीतून प्रत्येक मुलीच्या नावे १० हजार रुपयांची ठेव स्वरुपात ठेवण्याचा निर्णय घेतलेल्या अनपटवाडी, ता. वाई या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातून एकूण ७५० मुली या पदयात्रेमध्ये सामिल झाल्या आहेत. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें